WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

धक्कादायक : नंबरप्लेट नसलेल्या वाहनांतून चक्क वाळूची वाहतूक


धक्कादायक : नंबरप्लेट नसलेल्या वाहनांतून चक्क वाळूची वाहतूक

🔴 बंदीतही संधी 

🔴 महसूल व वाहतूक पोलीस विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चिपळूण : राज्य शासनाने पावसाळ्याच्या काळात वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर स्पष्ट बंदी लागू केलेली असतानाही चिपळूण तालुक्यात बेकायदा वाळू वाहतूक आणि विक्री सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे, काही ठिकाणी नंबरप्लेट नसलेल्या डंपर व ट्रॅक्टरमधून दिवसा ढवळ्या वाळूची वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, याकडे महसूल विभागासह वाहतूक पोलीस यांचेही दुर्लक्ष होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळा सुरू झाल्यानंतर शासनाने वाळू उत्खनन व वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. असे असतानाही काही व्यावसायिकांनी आधीच मोठ्या प्रमाणात वाळूचा साठा करून त्याची विक्री सुरू ठेवली असल्याचे सांगितले जात आहे. बांधकामांसाठी वाळूची मागणी कायम असल्याने या परिस्थितीचा फायदा घेत काही जण ट्रॅक्टर आणि डंपरच्या माध्यमातून वाळूची वाहतूक करीत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

या प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही वाहनांवर नंबरप्लेटच नसल्याचा आरोप होत आहे. अशा वाहनांमधून दिवसा सर्रास वाळूची वाहतूक होत असतानाही संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध व्यवसायाला अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

तालुक्यात विक्रीसाठी येणारी वाळू नेमकी कोणत्या ठिकाणाहून आणली जाते, ती अधिकृत साठ्यातील आहे की बेकायदा उत्खननातून आणली जाते, याबाबतही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

महसूल विभाग, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवून नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर तातडीने कारवाई करावी. तसेच बेकायदा वाळू उत्खनन, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

भर पावसात शासनाच्या बंदी आदेशांना हरताळ फासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणा आता नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 


614
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!