आयएमए चिपळूणतर्फे ज्येष्ठ डॉक्टरांचा जीवनगौरव सन्मान
नवीन कार्यकारिणी बिनविरोध निवड
अध्यक्षपदी डॉ. अब्बास जबले यांची फेरनिवड
चिपळूण : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) चिपळूण शाखेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त ३ जुलै रोजी रूफ टॉप हॉटेल, चिपळूण येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय डॉक्टर्स दिन दरवर्षी १ जुलै रोजी साजरा केला जात असला, तरी शाखेच्या नियोजनानुसार यावर्षी हा कार्यक्रम ३ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आशीर्वाद थत्ते होते. प्रारंभी आयएमए चिपळूण शाखेचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी उपस्थितांचे स्वागत करून राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे महत्त्व, वैद्यकीय व्यवसायातील सामाजिक जबाबदारी आणि डॉक्टरांच्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वैद्यकीय क्षेत्रात अनेक वर्षे उल्लेखनीय सेवा बजावलेल्या ज्येष्ठ डॉक्टरांचा “लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड” देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित मान्यवरांमध्ये डॉ. दिलीप पाटील, डॉ. संजीव साने, डॉ. गौरी साने, डॉ. प्रकाश पाटणकर, डॉ. दीप्ती पाटणकर, डॉ. ग. ल. जोशी, डॉ. विद्या जोशी आणि डॉ. अंजली शारंगपाणी यांचा समावेश होता.
सन्मानित डॉक्टरांचा परिचय डॉ. मुश्ताक मुकादम, डॉ. गणेश जोशी, डॉ. मनीषा वाघमारे, डॉ. अनुपमा जोशी आणि डॉ.अश्विनी कुलकर्णी यांनी करून दिला. त्यांनी प्रत्येक डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवांचा, समाजासाठी केलेल्या कार्याचा आणि त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
अध्यक्षीय समारोपात डॉ. आशीर्वाद थत्ते यांनी सन्मानित डॉक्टरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या सेवाभावी कार्यातून नव्या पिढीतील डॉक्टरांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर आयएमए चिपळूण शाखेच्या 2026-2028 या वर्षासाठीच्या निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकारी डॉ. प्रकाश पाटणकर यांनी जाहीर केला. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. अब्बास जबले यांची सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदी डॉ. मुशताक मुकादम, सचिवपदी डॉ. गणेश जोशी, बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. संग्राम दाभोलकर, डॉ. कौस्तुभ देवस्थळी, डॉ. पंकज कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्यांचीही बिनविरोध निवड झाली.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित सर्व डॉक्टरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.











