आदेश कासारच्या जिद्दीला यशाचा सलाम!
🔷धामेली जिल्हा परिषद शाळा ते आयआयएम इंदोर प्रवास
🔷दोन वर्षे दिवसाला १६ ते १८ तास अभ्यास
🔷पहिल्या अपयशानंतरही हार नाही
🔷CAT मध्ये ९९.३३ पर्सेंटाईल मिळवत गाठले यशाचे सर्वोच्च शिखर
चिपळूण : स्वप्न मोठं असेल, जिद्द अढळ असेल आणि मेहनतीची तयारी असेल, तर गरिबीही यशाच्या आड येऊ शकत नाही, याचं जिवंत उदाहरण म्हणजे चिपळूण तालुक्यातील धामेली गावचा आदेश किरण कासार. बांधकाम मजुराच्या कुटुंबात वाढलेल्या या होतकरू विद्यार्थ्याने जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात करत देशातील सर्वोच्च व्यवस्थापन शिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या आयआयएम इंदोरमध्ये प्रवेश मिळवून आपल्या कुटुंबासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.
धामेली हे आदेशचे मूळ गाव. त्याचे प्राथमिक शिक्षण धामेली येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर भोम हायस्कूलमध्ये आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून डीबीजे महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे पहिलीपासून बारावीपर्यंत तो नेहमीच प्रथम किंवा द्वितीय क्रमांक पटकावत राहिला.
बारावीनंतर त्याने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) होण्याचे स्वप्न पाहिले. सीए फाऊंडेशन परीक्षाही त्याने यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. मात्र व्यवस्थापन क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी आयआयएममध्ये प्रवेश घेण्याचा निर्धार त्याने केला. त्यानुसार मुंबईतील खालसा महाविद्यालयात बी.कॉम.साठी प्रवेश घेतला.
बी.कॉम.च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात त्याने घरी राहून कॅट (CAT) परीक्षेची जोरदार तयारी केली. सलग दोन वर्षे दिवसाला तब्बल १६ ते १८ तास अभ्यास करूनही पहिल्या प्रयत्नात त्याला अपेक्षित यश मिळाले नाही. अनेक जण अशा अपयशानंतर खचून गेले असते; मात्र आदेशने हार मानली नाही.
पदवी पूर्ण झाल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरी करत असतानाही त्याने कॅट परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. अखेर दुसऱ्या प्रयत्नात त्याने तब्बल ९९.३३ पर्सेंटाईल गुण मिळवत आयआयएम इंदोरमध्ये प्रवेश निश्चित केला. जून २०२६ मध्ये प्रवेश निश्चित झाल्याची बातमी कळताच कासार कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आदेशच्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुंबईत येऊन त्याचे विशेष अभिनंदन केले.
देशभरात आयआयएमच्या २३ संस्था असून त्यापैकी कलकत्ता, अहमदाबाद, बेंगळुरू, लखनऊ, इंदोर आणि कोझिकोड या सहा संस्था सर्वोच्च मानल्या जातात. या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी देशभरातील अत्यंत हुशार विद्यार्थी प्रयत्नशील असतात. आयआयटी, वैद्यकीय आणि इतर प्रतिष्ठित शाखांतील विद्यार्थीही आयआयएममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे आदेशचे हे यश अधिकच उल्लेखनीय मानले जात आहे.
आदेशची आर्थिक परिस्थिती मात्र अत्यंत साधी. आई-वडील आणि चार बहिणींचा परिवार. वडील बांधकाम कारागीर असून आईही आजही बांधकामाच्या कामात त्यांना खांद्याला खांदा लावून मदत करते. शिक्षण घेत असतानाच आदेशनेही अनेकदा वडिलांसोबत बांधकामावर काम केले. कष्टाची त्याला कधीच लाज वाटली नाही. उलट त्याच कष्टांनी त्याच्या स्वप्नांना बळ दिले.
आदेश सांगतो, “शालेय वयात पालकांचे संस्कार खूप महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे. अपयश स्वीकारण्याची आणि त्यातून पुन्हा उभे राहण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. आयआयएमसारख्या संस्थेत प्रवेश मिळवण्यासाठी कितीही मेहनत घेतली, तरी ती कमीच असते.”
धामेलीच्या मातीतून घडलेला हा हिरा आज देशातील सर्वोच्च व्यवस्थापन संस्थेत चमकत आहे. आदेश कासारची ही यशोगाथा केवळ एका विद्यार्थ्याची उपलब्धी नसून ग्रामीण भागातील प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी अविरत संघर्ष करण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.









