वाहनांचा बेफाम वेग अन् ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ!
🔴खडपोली मार्गावरील दिवसा अवजड वाहतुकीमुळे ग्रामस्थ संतप्त
🔴मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
चिपळूण : पिंपळी येथील वाशिष्ठी नदीवरील पूल कोसळल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून परिसरातील सुमारे १० ते १२ गावांचा संपर्क विस्कळीत झाला आहे. पुलाच्या पर्याय म्हणून पेढांबे–खडपोली मार्गे वाहतूक वळविण्यात आली असली, तरी या मार्गावर सुरू असलेल्या दिवसा अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पुलाच्या दुर्घटनेनंतर प्रांताधिकारी, तहसीलदार, एमआयडीसीचे अधिकारी, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत अवजड वाहनांची वाहतूक केवळ रात्रीच्या वेळेत करण्याचे नियोजन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे शेतकरी, शाळकरी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना होणारा त्रास टाळता येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात हे नियोजन राबविण्यात आले नसून दिवसा सर्रास अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप दिलीप धो. मोहिते, ओंकार बापट, शैलेश पवार, रमेश जाधव, राजाभाऊ कदम, शिवाजी गोटल, रघुनाथ पवार, ग्रामपंचायत सदस्य राजेश पवार,रियान अडरेकर आमदभाई अडरेकर, पपू भुवड, विनायक कदम आणि खडपोली ग्रामस्थ यांनी केला आहे.यामुळे परिसरात गंभीर अपघात घडत असल्याचाही ग्रामस्थांचा दावा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीत कामावर जात असताना एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला. तसेच समोरून येणाऱ्या अवजड वाहनाच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर कराड येथे उपचार सुरू होते, मात्र त्यांचाही उपचारादरम्यान पाच दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती ग्रामस्थांनी सांगितले. या घटनांना जबाबदार कोण, असा संतप्त सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, गावातील उद्योग किंवा कंपन्या बंद व्हाव्यात, अशी त्यांची भूमिका नाही. मात्र, स्थानिकांच्या सुरक्षिततेचा विचार न करता त्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. शासनाच्या निर्देशानुसार अवजड वाहनांची वाहतूक रात्री करण्याचे आदेश असताना दिवसा ती सुरू कशी राहते आणि याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये कामासाठी जाणारे कामगार, शेतकरी तसेच विद्यार्थी यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या प्रश्नाकडे ग्रामपंचायत सदस्य व सरपंच यांनीही गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली असून स्थानिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
यासंदर्भात ग्रामस्थ लवकरच संबंधित शासकीय अधिकारी, एमआयडीसी प्रशासन, स्थानिक आमदार आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी करणारे निवेदन देणार आहेत. या बैठकीत वाहतुकीचे नियोजन, रस्त्यांची दुरुस्ती, ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात येणार आहे.
याशिवाय, एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांनी अत्यल्प मोबदल्यात जमिनी दिल्या त्यामागे स्थानिक युवकांना रोजगार, गावाच्या विकासासाठी सीएसआर निधी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसह परिसराचा सर्वांगीण विकास हा उद्देश होता. मात्र, अनेक कंपन्या कार्यरत असूनही स्थानिक युवकांना अपेक्षित प्रमाणात रोजगार मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच रासायनिक व प्रदूषित पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन अंमलबजावणी करावी, अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.











