खेर्डी-दत्तवाडी येथील साई मंदिरात उद्या गुरुपौर्णिमा महोत्सव
चिपळूण, ता. २८ : शहरालगतच्या खेर्डी -दत्तवाडी मधील’स्वामिनी’ येथील साई मंदिरात बुधवार, दि. २९ जुलै २०२६ रोजी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन, आरती, भंडारा आणि भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महोत्सवाची सुरुवात सकाळी १० वाजता होणार असून कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यानिमित्त दुपारी १ ते २ या वेळेत साईनाथ भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता साईंची नित्य आरती होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता जय हनुमान मित्र मंडळ, ओझरवाडी (चिपळूण) यांच्या वतीने गुरुभजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
या गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन भाजपचे जिल्हा अध्यक्ष व वाशिष्टी डेअरीचे अध्यक्ष श्री. प्रशांत बबन यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व वाशिष्टी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना प्रशांत यादव तसेच त्यांची सुकन्या डॉ. स्वामिनी प्रशांत यादव यांनी केले असून, परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.











