निवळीत कृषी कन्यांतर्फे माती परीक्षण प्रात्यक्षिक
चिपळूण, ३ जुन – ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या कृषी दूतांतर्फे तालुक्यातील निवळी येथे शेतकऱ्यांसाठी ‘माती परीक्षण प्रात्यक्षिक घेण्यात आले. शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमादरम्यान कृषीदूतांनी शेतकऱ्यांना मातीचा नमुना कधी व कसा घ्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. “पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी, तसेच रासायनिक खते देण्यापूर्वी अथवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी जमिनीतील मातीचा नमुना घ्यावा. त्यानुसारच योग्य खत व्यवस्थापन करावे,” असा महत्त्वपूर्ण सल्ला यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आला. कार्यक्रमात प्रत्यक्ष शेतातील मातीचे नमुने गोळा करून त्याचे परीक्षण करण्यात आले. जमिनीचा सामू आणि मातीचा प्रकार ओळखणे. मातीमध्ये असणारे विविध घटक आणि त्यांचे प्रमाण. माती परीक्षणाचे प्रत्यक्ष फायदे. जमिनीतील पोषक घटक दिवसेंदिवस कसे अबाधित राखता येतील याच्या आधुनिक पद्धती आदी माहिती देण्यात आली. हा संपूर्ण उपक्रम कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य बाळासाहेब सूर्यवंशी, मृदाशास्त्र विभागाचे प्राध्यापक महेंद्र गावणंग आणि ग्रामीण कृषी कार्यानुभव समन्वयक प्रा. प्रशांत इंगवले यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कृषीदुत शितल डोहळे, सानिका भोसले , वैष्णवी कोकरे, मयुरी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले.












