एस.टी.स्टँडमध्ये पाच लाख हातोहात लांबविले
🔴गर्दीचा फायदा घेत चोरी
🔴चिपळूण पोलिसांत अज्ञातावर गुन्हा दाखल
चिपळूण : येथील एस.टी.स्टँड परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना अज्ञात इसमाने एका प्रवाशाच्या सॅकमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोख रक्कम लांबविल्याची घटना गुरुवारी दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४० वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत प्रज्ञा प्रशांत हरेकर (वय ३८, व्यवसाय गृहिणी, रा. मुंडे तर्फे सावर्डे, पोरनाकवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार चिपळूण एस.टी.स्टँड येथे त्या चिपळूण ते वीरबंदर जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये चढत असताना, गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या काळ्या रंगाच्या सॅकची चैन उघडून परवानगीशिवाय लबाडीच्या उद्देशाने सॅकमधील रोख रक्कम चोरून नेली.
चोरीस गेलेल्या मालामध्ये प्रत्येकी ५०० रुपयांच्या १०० नोटांचे एक बंडल असे एकूण १० बंडल, म्हणजेच एकूण रोख रक्कम ५,००,००० रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद रात्री १०.१५ वाजता करण्यात आली.
घटनेनंतर पोलिसांनी एस.टी.स्टँड परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. एस.टी.स्टँडसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बाळगताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












