WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

रमा करमरकर ठरल्या ‘सुपर रँडोनिअर’


सौ.रमा करमरकर ठरल्या ‘सुपर रँडोनिअर’

    जिद्द, शिस्त आणि सेवाभावाचा प्रेरणादायी प्रवास

चिपळूण : जिद्द, चिकाटी आणि शिस्तीच्या जोरावर कोणतीही आव्हाने पेलता येतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करत चिपळूण सायकलिंग क्लबच्या सौ. रमा करमरकर यांनी ‘सुपर रँडोनिअर’ हा मानाचा किताब पटकावला आहे. ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्स संलग्न सह्याद्री रँडोनिअर्स, चिपळूण यांच्या वतीने आयोजित २००, ३००, ४०० आणि ६०० किलोमीटरच्या बीआरएम (Brevets de Randonneurs Mondiaux) यशस्वीरीत्या पूर्ण करत त्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली.
ऑडाक्स इंडिया रँडोनिअर्सच्या अंतर्गत देशभरातील विविध क्लबमार्फत बीआरएम सायकल स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये २०० किमी साठी १३.५ तास, ३०० किमी साठी २० तास, ४०० किमी साठी २७ तास आणि ६०० किमी साठी ४० तासांची कमाल मुदत निश्चित असते. विशेष म्हणजे या सर्व राईड्स पूर्णपणे ‘सेल्फ-सपोर्टेड’ स्वरूपाच्या असतात. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत सर्व चार अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर सायकलस्वाराला ‘सुपर रँडोनिअर’ हा किताब प्रदान केला जातो.
सौ. रमा करमरकर यांनी २० डिसेंबर रोजी ६०० किमीची बीआरएम अवघ्या ४० तासांच्या आत पूर्ण करत हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. ही कामगिरी केवळ शारीरिक ताकदीची नव्हे, तर मानसिक स्थैर्य, नियोजन आणि प्रचंड संयमाची साक्ष देणारी आहे.
आपल्या यशाविषयी बोलताना सौ. रमा करमरकर म्हणाल्या की, “चिपळूण सायकलिंग क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाले. प्रत्येक राईडमध्ये मिळालेला पाठिंबा, मार्गदर्शन आणि प्रेरणा अमूल्य ठरली.”
सौ. रमा करमरकर या चिपळूण पोलिस स्थानकात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असून खात्याअंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्या सातत्याने सहभागी होत असतात. यापूर्वीही त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. विशेष म्हणजे २०२१ च्या महापुराच्या काळात अडकलेल्या नागरिकांचे धाडसाने प्राण वाचवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
सेवाभाव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. तालुक्यातील एकेकट्या वृद्धांची काळजी घेणाऱ्या ‘सांज सोबत’ या गटाच्या त्या सक्रिय सदस्या असून पोलिस ठाण्यात तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे समुपदेशन, मदत व मार्गदर्शन करण्यासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात.
दरम्यान, सह्याद्री रँडोनिअर्स क्लबतर्फे ही बीआरएम कराड–सोलापूर–विजापूर–तासगाव–कराड या आव्हानात्मक मार्गावर आयोजित करण्यात आली होती. मुंबई, सातारा, विटा, इचलकरंजी आणि चिपळूण येथून अनेक सायकलस्वार या मोहिमेत सहभागी झाले होते. सायकलस्वारांची सुरक्षितता, आहार, आरोग्य आणि मनोबल याकडे विशेष लक्ष ठेवल्याबद्दल सह्याद्री रँडोनिअर्सचे सर्वेसर्वा श्री. मनोज भाटवडेकर यांच्याबद्दल सर्व सायकलस्वारांनी कृतज्ञता व्यक्त केली. संपूर्ण मार्गावर आयोजकांची उपस्थिती ही राईड यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
सौ. रमा करमरकर यांच्या या प्रेरणादायी कामगिरीबद्दल चिपळूण सायकलिंग क्लब, मित्रपरिवार तसेच समाजातील विविध घटकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कर्तव्य, क्रीडा आणि समाजसेवा यांचा सुरेख संगम साधणाऱ्या सौ. रमा करमरकर आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!