जि.प., पं. स. निवडणुकीतही ‘राष्ट्रवादी’विना महायुती
पालकमंत्री उदय सामंत स्पष्टच बोलले
चिपळूण : नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीने एकहाती सत्ता मिळवत राजकीय ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची कोणतीही फसवणूक केली नसून, युतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवून स्पष्ट कौल मिळवला, असा ठाम दावा पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. याच वेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठीही हाच युतीचा पॅटर्न कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना–भाजप युतीने १६ जागा जिंकत निर्विवाद सत्ता मिळवली असून, नगराध्यक्षपदी उमेश सकपाळ यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी अतिथी सभागृहात नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा पार पडला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सामंत म्हणाले, “जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राजापूरात काही जागा थोडक्यात गेल्या असल्या तरी तेथेही नगरसेवकांची संख्या वाढली आहे. रत्नागिरी, लांजा, देवरूख, चिपळूण, गुहागर आणि खेड येथे युतीने दमदार कामगिरी केली आहे.”
चिपळूणमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत युती व्हावी अशी आमचीही इच्छा होती; मात्र ठराविक जागांवर ते अडून बसल्यामुळे युती शक्य झाली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिले तरी त्यांना एकही जागा जिंकता आली नाही, याकडे लक्ष वेधत सामंत म्हणाले, “चिपळूणातही राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे आता आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद असतील.”
यावेळी शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण म्हणाले, “कोण फसवणूक करत होते हे मतदारांनीच निकालातून दाखवून दिले आहे. ज्या जागांवर राष्ट्रवादी अडून बसली, तेथे त्यांचे उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले. यातून त्यांनी बोध घ्यायला हवा.”
भाजप नेत्यांनीही युती म्हणून योग्य नियोजन केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे सांगत मतदारांनी दाखवलेला विश्वास कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी शहर विकासाला गती देण्याचे आश्वासन दिले. चिपळूण शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चिपळूण पालिकेच्या नवीन इमारतीसाठी एक महिन्यात निधी मंजूर केला जाईल, असे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी यावेळी दिले. या सत्कार सोहळ्यास रायगडचे मंत्री भरत गोगावले, माजी आमदार संजय कदम, भाजप जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, शशिकांत चव्हाण, शहरप्रमुख व नगरसेवक शशिकांत मोदी, तालुकाप्रमुख विनोद भूरण, संदेश आयरे यांच्यासह युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










