कोयना प्रकल्प टप्पा ३ व ४ च्या प्रलंबित मागण्यांवर उद्या रत्नागिरीत बैठक
दीपक मोहिते यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल
खेड : कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा ३ व ४ अंतर्गत बाधितांच्या प्रलंबित मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक उद्या २४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मा. अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जुनी इमारत, पहिला मजला येथे होणार आहे.
कोयना प्रकल्प टप्पा ३ व ४ मधील प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी कोयना जलविद्युत प्रकल्पात संपूर्ण जीवन समर्पित करणार असल्याची माहिती प्रकल्पग्रस्त श्री. दीपक भिकाजी मोहिते (रा. मौजे चाकाळे, कोळकेवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दिलेल्या पत्राद्वारे प्रशासनाला कळवली होती.
या पार्श्वभूमीवर संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्यांवर चर्चा व तोडगा काढण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बैठकीस श्री. मोहिते यांनी समक्ष उपस्थित राहावे, असेही पत्राद्वारे कळवण्यात आले आहे.
सदर बैठक मा. अपर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आली असून, या बैठकीकडे कोयना प्रकल्प बाधितांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.










