WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूणच्या खेळाडूंची दिल्लीत झेप


चिपळूणच्या खेळाडूंची दिल्लीत झेप

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचा संघ रवाना

चिपळूण, दि. २९ जुलै : चिपळूण येथील मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडण्याची संधी मिळवली असून, राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अकॅडमीचा संघ दिल्लीकडे रवाना झाला आहे. या संघाचे नेतृत्व महाराष्ट्र इन्व्हिटेशन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पार्थ हरेकर याच्याकडे सोपविण्यात आले आहे.

मास्टर्स क्रिकेट अकॅडमीने गेल्या काही वर्षांत जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरी करत चिपळूणच्या क्रिकेट क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. खेळाडूंच्या मेहनतीसह प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि नियोजनबद्ध सरावाच्या बळावर अकॅडमीने सलग सहाव्या वर्षी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचा मान कायम राखला आहे. ही बाब चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची मानली जात आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत संघाची धुरा पार्थ हरेकर याच्याकडे देण्यात आली असून, महाराष्ट्र इन्व्हिटेशन स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याच्याकडून संघाचे प्रभावी नेतृत्व होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या संघात पार्थ हरेकर (कर्णधार), साईश खेडेकर, ऋग्वेद मोहिते, सादीम साबळे, अहिल बालाभाई,अथर्व सागवेकर, अर्णव मोरे, मुहम्मद तांबे, अनुज वामने, शौर्य लांगी, आराध्य कदम, मोहम्मद सईद, अर्जुन कदम, दाउद परकार यांचा समावेश आहे.

अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळत असून, त्यांच्या अथक परिश्रमांमुळे अनेक खेळाडूंना राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना क्रीडाप्रेमी, पालक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे खेळाडू आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर चिपळूण आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधिक उज्ज्वल करतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!